श्री १००८ भ. पार्श्वनाथ दिगंबर जीनमंदिर गंगावेस
इतिहासात महाराष्ट्राने अनेक राजे आणि राजवटी पाहिल्या. त्यातील एक राजवट म्हणजे शिलाहार राजवट, जी पूर्णपणे कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रात होती. त्यातील सातारा, सांगली, कोल्हापूर आणि बेळगाव जिल्ह्यावर त्यांचे राज्य होते. कोल्हापूर शिलाहार राजवटीने त्यामध्ये राजा जतिग पासून राजा भोज (दुसरा) पर्यंत अनेक राजे होऊन गेले. याच कोल्हापूर शिलाहार राजवटीत एक प्रसिद्ध राजा होऊन गेला त्याचे नाव होते गंडरादित्य या राजाचे अनेक शिलालेख, ताम्रपट कोल्हापूर आणि परिसरामध्ये सापडतात. आजच्या कोल्हापूरच्या जडण-घडणीत या राजा गंडरादित्याचा खूप मोठा वाटा आहे.
याच गंडरादित्य राजाच्या पदरी एक अत्यंत पराक्रमी, धर्मानुयायी, शूर, वीर, स्वामीनिष्ठ जैन सेनानी होऊन गेला ज्याचे नाव होते महासामंत सेनानी निंबदेवरस. त्यावेळचे जैन आचार्य माघनंदी सिद्धांतिदेव हे महासामंत निंबदेवरस यांचे गुरु होते. याच गुरूंच्या आशीर्वादाने निंबदेवानी शेकडो जैन मंदिरे निर्माण केली. ज्यामध्ये कोल्हापूर येथील रूपनारायण बस्ती, पट्टणकोडोली येथील जैन मंदिर, खिद्रापूर येथील कलात्मक जैन बस्ती ही काही निवडक जैन मंदिरे सांगता येतील. निंबदेवांचे धार्मिक कार्य इतके व्यापक होते की, दक्षिणेतील एक अत्यंत धार्मिक, पवित्र आणि प्रत्येक जैन बांधवांच्या श्रद्धेच अति पुरातन जैन धार्मिक स्थळ असलेल्या श्रवणबेळगोळ येथे याच सामंत निमदेवांच्या नावाने एक जैन बस्ती (मंदिर) आजही पाहायला मिळते. याच बस्तीचे नाव सामंत बस्ती असे आहे.
निंबदेवरस यांनी निर्माण केलेल्या रूपनारायण बस्तीलाच सध्याचे श्री १००८ भ. पार्श्वनाथ दिगंबर मानस्तंभ जैन मंदिर असे नाव पडले. ब्रह्मपुरी टेकडी पासून कोल्हापूर शहर वसले गेले जिथे रूपनारायण मंदिर हे कसबा गेट, गंगावेश येथे ई.सण ११०० च्या काळात गंडरादित्य या राजाचा सामंत निंबदेवरस यांनी हे मंदिर बांधल्याचा स्पष्ट शिलालेख उपलब्ध आहे.
गंगावेशीतील दक्षिणेला वरती आले की, कसबा गेट कडे जाणाऱ्या रस्त्याच्या वळणावरचं हे मंदिर आहे. मंदिर बाहेरून सहज दिसत नाही; पण मंदिराच्या आवारात गेले की, मंदिराच्या दगडी भिंती, नक्षीदार खांब लक्ष वेधून घेतात व यावरूनच मंदिराची प्राचीनता लक्षात येते.
या मंदिरामध्ये अर्धमंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह असे मंदिराचे चार भाग आहेत. सभामंडपातले खांब हे अत्यंत भव्य, रेखीव व नक्षीदार आहेत. याच खांबांवर मंदिराचे छत व शिखर उभे आहे. मंदिरामध्ये अत्यंत देखणी श्री १००८ भ. पार्श्वनाथ तीर्थंकरांची उभी मूर्ती आहे. तसेच सभा मंडपामध्ये अत्यंत रेखीव आणि देखण्या श्री आदिनाथ भगवंत, श्री नेमिनाथ भगवंत व पंच-परमेष्ठी यांच्या दगडातील कोरीव मूर्ती आहेत. तसेच एका बाजूला श्री पद्मावती माता व श्री ज्वालामालिनी माता तसेच श्री ब्रम्हनाथ महाराज यांच्या अत्यंत देखण्या मुर्त्या आहेत.
या मंदिराचा मानस्तंभ बांधून साधारणपणे ३०० वर्षे पूर्ण झाली. हा मानस्तंभ अत्यंतरेखीव आहे व काळ्या दगडामध्ये बनवलेला आहे. अत्यंत रेखीव व सुबक अशा मानस्तंभरचनेमुळेच या मंदिर चे नाव पार्श्वनाथ दिगंबर मानस्तंभ जैन मंदिर ठेवल्याचे बोलले जाते.
तसेच मंदिराचे शिखर ही अत्यंत देखणे व खूप उंच आहे. मंदिराचा कळस व कळसाच्या आतील भागांमध्ये श्री बाहुबली भगवंतांची मूर्ती बसवून साधारणपणे ३०० वर्षे झाल्याचा पुरावा सापडतो.
मंदिराचा जिर्णोद्धार साधारणपणे २०१४ ते २०१८ या वर्षांमध्ये पूर्ण झाला व त्यानंतर श्री १००८ भ. पार्श्वनाथ तीर्थंकर यांचे पंचकल्याणक प्रतिष्ठान २५ जानेवारी ते २९ जानेवारी २०१९ मध्ये संपन्न झाले.
या मंदिराच्या आवारात सापडलेल्या शिलाल लेखात तत्कालीन समाज व्यवस्थेवर प्रकाशझोत टाकणारा आहे. या शिलालेखावर कुंभ, गाय, वासरू, सूर्य, चंद्र यांच्या प्रतिकृती आहेत. या शिलालेखावरील मजकूर हा अत्यंत स्पष्ट लिहिलेला आहे. यामध्ये कोल्हापूर, तुरंबे, मिरज, कवठेगुलंद व खारेपाटण या गावांवर का व कशासाठी कर बसविला याचे कारण स्पष्ट करणार आहे. या शिलालेखामुळे तत्कालीन वजन मापाच्या पद्धतीवर ही प्रकाशझोत पडतो. या शिलालेखात म्हटले आहे की पूर्ण ओझ्यावर पन्नास, अर्ध्या ओझ्यावर वीस, हसरावर पाच सुपाऱ्या, डोईवरून आणलेल्या ओझ्यावर पंचवीस विड्याची पाने, तुपाच्या आणि तेलाच्या घड्यावर एक सोळगे, सोनाराच्या दुकानात विकल्या जाणाऱ्या मालाच्या किमतीत प्रत्येक होंगावर एक फळ, कापडाच्या प्रत्येक मुळव्यावर पाच फळ, सुताराच्या प्रत्येक घरातून एक त्रिपद मरवी आणि दरवर्षी एक खाट, हळद, सुंठ, लसूण बजे यांच्या प्रत्येक ओझ्यावर पाच फळे, अर्ध्या उज्यावर दोन फळ, धान्याच्या प्रत्येक गाडीवर एक कोळगे, फळाच्या प्रत्येक गाडीवर दहा फळे, गाडी भर आवळ्यावर एक दंडीघे व पाच आवळे, फुलाच्या प्रत्येक टोपलीवर एक हार व कुंभाराकडून एक मडके असे या प्रकारचे कराचे स्वरूप त्या काळात या शिलालेखावर सापडते.
गंगावेश, कोल्हापूर